किरकोळ आपत्तीतही प्रशिक्षणच ठरते जीवनरक्षक! एनआरडीएफ अधिकारी महेश शिंदे; आजरा महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

किरकोळ आपत्तीतही प्रशिक्षणच ठरते जीवनरक्षक! एनआरडीएफ अधिकारी महेश शिंदे; आजरा महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

आजरा : मोठ्या व सामूहिक आपत्तींच्या वेळीच नव्हे, तर दैनंदिन जीवनात वैयक्तिक पातळीवर उद्भवणाऱ्या किरकोळ आपत्तींच्या प्रसंगीही योग्य पद्धतीने आपत्ती निवारण करण्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील एनआरडीएफ केंद्राचे अधिकारी महेश शिंदे यांनी केले. आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महेश शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार होते.
            आपत्ती जलद कृती दलाचे आजरा तालुक्यातील हे पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी जलद कृती दलातील जवानांनी नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या काळात करावयाच्या उपाययोजना, बचावकार्याच्या विविध पद्धती आणि आपत्ती निवारणासाठी आवश्यक तंत्रांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विविध बचाव तंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे आणि प्रशिक्षित पद्धतीने मदतकार्य करणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
            कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी केले. यावेळी आपत्ती जलद कृती दलाचे १४ जवान व सपोर्टिंग स्टाफ, राष्ट्रीय कॅडेट कोअर (NCC) चे विद्यार्थी, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, कार्यलयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील,  एनसीसी विभागप्रमुख डॉ. संजय चव्हाण, पर्यवेक्षक मनोज पाटील, NSS सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा, रणजीत पवार, प्रा. अनुराधा मगदूम, प्रा. स्वाती माने, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. डी. जे. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती रुपाली पिळणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ विभागाचे NSS प्रकल्प अधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी केले.